मुंबई  : निर्माता दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar Party) आयोजीत केलेल्या पार्टीवर भाजप नेते आशिष शेलार  (Shish Shelar)  यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. त्यावर आता मुंबई महापालिकेने (BMC) स्पष्टीकरण दिले आहे. 


"बाधित रुग्णांचा संपर्क आलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही तपासणे हे मुंबई महापालिकेच्या कोविड नियमावलीत बसत नाही. बाधित रुग्णांचा वावर जेथे झाला आहे त्या 3 इमारतींमध्ये कोविड टेस्टींग कॅम्प भरवून 110 जणांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या आहेत. परंतु, या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. करण जोहरच्या इमारतीतील एकूण 54 टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. करण जोहर आणि बाधित रुग्णांनी दिलेल्या माहितीवरुन केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगनुसार 8 जण या पार्टीत होते. त्यांच्या जवळच्या संपर्कातील सर्वांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत." अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.  


काय म्हणाले होते आशिष शेलार? 
"मी पालिकेला विचारले की, तुम्ही रिजेसी नामक इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे का? त्यावेळी पालिकेकडून नाही असे उत्तर आले. त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होते का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असतील तर त्यांनी पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होते का त्याची स्पष्टता असावी." असे शेलार म्हणाले होते. 


"करण जोहर याच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीतील सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाला अशा बातम्या वाचल्या. करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक होते? त्या सर्वांची टेस्ट झाली का? असे प्रश्न मी पालिकेला विचारले या पार्टीत किती लोक होते यावरून संशय निर्माण होत आहे." असे मत शेलार यांनी व्यक्त केले होते. 


महत्वाच्या बातम्या