मुंबई:  “मुंबईसारखं शहर हे अस्ताव्यस्त वाढत आहे. कोणत्याही शहराची एक मर्यादा असते. तुडूंब भरलेल्या मुंबईत लोकसंख्येवर आळा घालायला हवा”, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार हेमा मालिनी यांनी दिली.


लोअर परळमधील कमला मिल कम्पाऊंड आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. त्याबाबत बोलताना हेमा मालिनी यांनी मुंबईतील लोंढ्यावर बोट ठेवलं आहे.

“मुंबईत गर्दी खूपच वाढली आहे. मुंबई अस्ताव्यस्त वाढत दुसऱ्या शहरांपर्यंत पोहोचली आहे. एक शहर संपतं की नाही, तोच दुसरं शहर सुरु होतं. त्यामुळे मुंबई कुठे संपते हेच कळत नाही. मुंबईची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सर्वात आधी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायला हवं.  प्रत्येक शहराला काही मर्यादा, काही बंधनं असतात. त्यानंतर त्या शहरात कोणालाही परवानगी दिली जाऊ नये. त्यांना दुसऱ्या शहरात जाऊ द्या”, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

यावेळी हेमा मालिनी यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं. आपत्ती काळात पोलीस  आपली जबाबदारी चोख पार पाडतात, मात्र अतिलोकसंख्येमुळे अशा दुर्घटनांना सामोरं जावं लागत असल्याचं, हेमा मालिनी यांनी नमूद केलं.


दोषींवर कारवाई होणारच: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्नितांडव झालेल्या कमला मिल कम्पाऊंड परिसराला आज भेट दिली.

"ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटेल मालकांवर कारवाई होणारच", असं मुख्यमंत्री म्हणाले.

याशिवाय ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अशा 5 बीएमसी अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर जाणीवपूर्वक परवाने दिले असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबईत काही संशयित बांधकामं आहेत, त्याचं ऑडिट करण्याचे आदेश बीएमसीला दिले आहेत. तसंच जे विनापरवाना हॉटेल्स वगैरे चालत असेल, तर ते पाडून टाकलं पाहिजे, असंही सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

5 अधिकाऱ्यांवर कारवाई

कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई - जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी  बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे.

निलंबित अधिकारी

  • मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी

  • धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर

  • महाले सब इंजिनिअर

  • पडगिरे - वैद्यकीय आरोग्य अधिकारी

  • एस. एस. शिंदे -अग्निशमन अधिकारी


काय आहे प्रकरण?

हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

संबंधित बातम्या

कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित

भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील

कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा! 

कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!

कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'

कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर... 

कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली 

मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू 

मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ