कल्याण : नशिब फळफळलं... तब्बल एक कोटी रुपयांची लॉटरी लागली... मात्र तरीही त्याच्या पदरी उपेक्षाच आली. कल्याणमध्ये एका टेम्पोचालकासोबत नशिबाने अशी थट्टा मांडली. कारण, त्याने खरेदी केलेलं लॉटरीचं तिकीट विजयी ठरली, मात्र तिकीट निघालं बनावट.
सुहास कदम असं टेम्पोचालकाचं नाव असून ते नालासोपऱ्याला राहतात. कल्याणच्या भाजी बाजारात कदम दररोज टेम्पो घेऊन येतात. आर्थिक चणचण असल्यामुळे नशिब आजमावून पाहण्यासाठी त्यांनी 16 मार्च रोजी कल्याणच्या प्रिन्स लॉटरी सेंटरमधून लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.
राज्य सरकारची गुढीपाडवा सोडत असं लिहिलेल्या या तिकिटावर एक कोटी 11 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 20 मार्च रोजी कदम यांनी लॉटरीचा निकाल तपासला असता त्यांना पहिलं बक्षीस लागल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, मात्र हा आनंद अल्पकाळ टिकला.
लॉटरीचं तिकीट घेऊन त्यांनी लॉटरीचं दुकान गाठलं असता आधी त्यांना नवी मुंबईला पाठवण्यात आलं. मात्र तिथे त्यांच्याकडे असलेलं तिकीट बनावट असल्याचं उघड झालं. त्यामुळे त्यांनी पुन्हा लॉटरी विक्रेत्याकडे जाऊन जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली.
अखेर याप्रकरणी त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी लॉटरी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे सुहास कदम हवालदिल झाले आहेत.