कल्याण डोंबिवली : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असून महापालिका (Kalyan-Dombivli) निवडणुकांनंतर आता सत्तास्थापनेसाठी अनेक खलबतं पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेत महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असतानाच एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं असलेल्या कल्याण-डोंबिवलीत (KDMC) मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून (MNS) पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा शिंदे सेनेला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, काही तासातच पाठिंबा काढून घेत आमचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलं. (Kalyan-Dombivli)
आधी पाठिंबा मग यूटर्न
त्यानंतर कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड घडत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी शिंदेंच्या शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्या काही तासातच यू टर्न घेत काँग्रेसने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्यासोबत, आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी दिले आहे.(Kalyan-Dombivli)
महापौरपदासाठी वाट्टेल ते....
कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाले होते. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती. अशातच ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करायला जाताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर होते. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ 11 वरुन 7 वर आले होते. मात्र, निवडणुकांवेळी एकमेकांविरुद्ध दंड थोपटलेल्या मनसेनं आता शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय चित्र बदल्याचं दिसून येतंय.
ठाकरे गटाचे जे दोन नगरसेवक मनसेत गेले होते, ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्ही मनसेत गेल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे. आता हे दोन आणि मनसेचे निवडून आलेले 5 नगरसेवका अशा 7 नगरसेवकांनी सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. स्वत: खासदार श्रीकांत यांनी याबाबत माहिती दिली.
