मुंबई : काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कारण विधानसभेच्या आवारात कालिदास कोळंबकर हे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांच्या हातात हात घालून फिरताना दिसले.


विशेष म्हणजे यावेळी नारायण राणेंना पराभूत करणारे आमदार वैभव नाईकही नार्वेकर यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये जाणार असं बोललं जातं आहे. मात्र वडाळा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे.  त्यामुळे कोळंबकर हातावर शिवबंधन बांधणार का या चर्चांना उधाण आलं आहे.



नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कालिदास कोळंबकर यांची जुनी ओळख आहे. मात्र राणेंविरोधात उभं ठाकत कोळंबकर शिवसेनेत प्रवेश करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आमदार कालिदास कोळंबकरांचा शिवसेना-भाजपला अपक्ष लढण्याचा अप्रत्यक्ष इशारा


राजकारणात अस्तित्व टिकवण्यासाठी एखादा राजकीय पक्ष पाठीशी लागतो. त्यासाठी मी पाठिंबा मागतोय, असं वडाळ्याचे बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटलं होतं. नायगावात माझी ताकद आहे, जनता माझ्या पाठीशी आहे. मी कोणाला आजमावत नाही, पण वेळ आली तर ताकद दाखवेन एवढं नक्की, असं म्हणत त्यांनी शिवसेना-भाजपला अप्रत्यक्ष अपक्ष लढण्याचा इशारा दिला होता.

दहा वर्ष मी काँग्रेसमध्ये राहून माझं एकही काम झालं नाही. म्हणून माझी नाराजी पक्षावर आहे, वैयक्तिक कोणावरही नाही. मी दीड वर्षापूर्वीच सांगितलंय की, विकास कामांसाठी मी देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा देणार. मी निवडणुकीला पाठिंबा जाहीर केलेला नाही, असं कोळंबकरांनी स्पष्ट केलं होतं.