Gaganyaan Mission Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. गगनयान क्रू मॉड्यूलसाठी (Gaganyaan Crew Module) तयार करण्यात आलेल्या ड्रोग पॅराशूट (Drogue Parachute) प्रणालीची पात्रता चाचणी यशस्वी झाली आहे. ही चाचणी चंदीगडमधील DRDO च्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) येथील रेल ट्रॅक रॉकेट स्लेड (RTRS) सुविधा येथे पार पडली.
ISRO Gaganyaan Mission : कठीण परिस्थितीतही कामगिरी यशस्वी
इस्रोने शनिवारी (20 डिसेंबर 2025) जारी केलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, 18 आणि 19 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आलेल्या दोन्ही चाचण्यांनी सर्व पूर्वनियोजित उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. या चाचण्यांमुळे वेगवेगळ्या उड्डाण परिस्थितींमध्ये ड्रोग पॅराशूटची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता (Performance and Reliability) यशस्वीरीत्या सिद्ध झाली आहे.
Drogue Parachute Test : गगनयानसाठी पॅराशूट सिस्टीम का महत्त्वाची?
गगनयान क्रू मॉड्यूलचे डिसेलेरेशन सिस्टीम (Deceleration System) ही अत्यंत जटिल आणि बहुपातळी (Multi-Stage) पॅराशूट प्रणाली आहे. या प्रणालीत चार प्रकारचे एकूण 10 पॅराशूट समाविष्ट आहेत.
क्रू मॉड्यूलच्या उतरणीची प्रक्रिया पुढील टप्प्यांत पूर्ण होते:
सर्वप्रथम एपेक्स कव्हर सेपरेशन पॅराशूट्स तैनात होतात, जे पॅराशूट कंपार्टमेंटचे संरक्षण कव्हर वेगळे करतात.
त्यानंतर दोन ड्रोग पॅराशूट्स तैनात होतात, जे क्रू मॉड्यूलला स्थिरता देतात आणि त्याचा वेग मोठ्या प्रमाणात कमी करतात.
ड्रोग पॅराशूटचे कार्य पूर्ण झाल्यानंतर तीन पायलट पॅराशूट्स तैनात होतात.
अखेरीस मुख्य पॅराशूट्स (Main Parachutes) उघडले जातात, जे यानाचा वेग आणखी कमी करून सुरक्षित आणि नियंत्रित लँडिंग सुनिश्चित करतात.
ISRO Drogue Parachute Test : ड्रोग पॅराशूटची भूमिका निर्णायक
इस्रोने स्पष्ट केले की, 'ड्रोग पॅराशूट हे गगनयान मिशनमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यानंतर क्रू मॉड्यूलला स्थिर ठेवणे आणि मुख्य पॅराशूट तैनातीसाठी आवश्यक असलेला वेग कमी करणे, ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे.'
ISRO Human Spaceflight Programme : मानवी अंतराळ मोहिमेच्या दिशेने पाऊल
या यशस्वी चाचणीमुळे मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम अंतर्गत गगनयान मिशनसाठी पॅराशूट सिस्टिम पात्र ठरवण्याच्या दिशेने इस्रोने एक भक्कम पाऊल टाकलं आहे. भारतासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या या मोहिमेचा मार्ग आता अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होत चालला आहे.