मुंबई : भायखळा जेलमधील मृत्यू झालेली महिला कैदी मंजुळा शेट्येच्या मृतदेहाचा पंचनामा 'माझा'च्या हाती लागला आहे. या रिपोर्टमध्ये मंजुळाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या नव्या आणि जुन्याही जखमा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच तिच्या गुप्तांगावरही कोणत्याही जखमा नसल्याचं पंचनाम्यामधून समोर आलं आहे.


भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूप्रकरणी जेल प्रशासनाकडूनही अहवाल सादर करण्यात आला. यात मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत, असा दावा जेल प्रशासनाने केला होता. याच जेलमधील कैदी इंद्राणी मुखर्जीने कालच कोर्टात धक्कादायक माहिती दिली होती. मंजुळावरही निर्भयासारखेच अत्याचार झाले होते, असा दावा इंद्राणीने कोर्टात केला होता.

मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप  

भायखळा जेलप्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन कोर्टासमोर साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीनं कोर्टासमोर केला. गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणींनं कोर्टासमोर सांगितलं.

“भायखळा जेलमधल्या घटनेनंतर जेल प्रशासनाने महिला कैद्यांवर लाठीचार्जचे आदेश दिले होते. तेव्हा लाठीचार्जसाठी महिलांसह पुरुष स्टाफही सहभागी झाला होता.”, अशी माहितीही इंद्राणी मुखर्जीने कोर्टात दिली.

दरम्यान, मंजुळा शेट्ये प्रकरणाचं नेमकं सत्य लवकरच बाहेर येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महिला आयोगाकडून गंभीर दखल

मुंबईतल्या भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूप्रकरणी महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे.  याबाबत राज्य महिला आयोगानं सुमोटो तक्रार दाखल केली आहे. तसेच, जेल अधीक्षकांना येत्या 29 तारखेला अहवाल घेऊन हजर राहण्यासही सांगितलं.

काय आहे नेमकं प्रकरण?

भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये  या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.  दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.

संबंधित बातम्या

भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू

भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार 

मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप  

महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखल