कल्याण : न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात कल्याणच्या गवई कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर सुनेची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या अपघातातून अकरा महिन्यांचं बाळ सुखरुप बचावलं आहे. मात्र अपघात होऊन 14 दिवस उलटले तरी या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
होऊ शकलेले नाहीत.


 
भारतीय दूतावासाच्या अनास्थेमुळे या कुटुंबाची परदेशात परवड सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. आपल्या अख्ख्या परिवाराला गमावलेल्या आनंद गवईची कैफियत. काही दिवसांपूर्वी कल्याणचे रहिवासी कमल गवई हे पत्नी अर्चनासोबत न्यूयॉर्कला गेले. 4 जुलै रोजी म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी मुलगा चंदन, त्याची पत्नी मनिषासोबत फिरायला गेले. ते घराबाहेर गेले ते कायमचेच. एका भरधाव ट्रकच्या धडकेत होत्याचं नव्हतं झालं.

 
या अपघातातून मनिषा बचावल्या, पण त्या कोमात आहेत. 11 महिन्यांचा इभानही वाचला, पण दोन्ही हातांच्या फ्रॅक्चरसह. पण नियतीचा खेळ इथंच थांबला नाही. 14 दिवसांनंतरही भाऊ आनंद आणि स्वप्निलला मृतदेहांचा ताबा मिळालेला नाही. कारण त्यासाठी लागणार आहेत तब्बल 26 लाख रुपये. पण आता कुठे थोडीशी मदतीची आशा निर्माण झाली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गवई कुटुंबियांची हाक ऐकून प्रस्ताव समोर ठेवला आहे.

 

आनंद गवई हे डच नागरिक असल्यानं त्यांना थेट पैसे देता येणार नाहीत, पण गवई कुटुंबाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च भारत सरकार करेल.
पत्नी मनिषाची परवानगी नसल्यानं चंदनचा आधी फक्त दफनविधी करु. नंतर मनिषा शुद्धीत आल्यानंतर तिच्या परवानगीने दहनविधी करता येईल. गवई कुटुंबाच्या तिघांचेही मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देण्याची व्यवस्था होईल. शिवाय गवई कुटुंबाच्या विम्याची रक्कमही मिळवून देण्यासाठी सहकार्य करु, असं आश्वासन दिलं गेलं आहे.

 
हा प्रस्ताव स्वीकारण्यापलिकडे आता परिवाराकडे पर्याय नाही. कारण गेलेलं माणूस काही परत येणार नाही याची कल्पना त्यांना आहे आणि त्यांचं उरलेल्या दोन जिवांना वाचवण्याचं आव्हानही या कुटुंबासमोर आहे.