दरम्यान, मोपलवारांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील मोपलवारांशी मध्यस्थी करणाऱ्या सतीश मांगलेनं याबाबत धक्कादायक माहिती दिली. एबीपी माझाशी बोलताना मांगलेनं स्पष्ट केलं की, ‘त्या ऑडिओ क्लीपमधील आवाज माझाच आहे.’
मोपलवारांची 'ती' ऑडिओ क्लीप खरी आहे : सतीश मांगले
‘मोपलवारांची ती ऑडिओ क्लीप खरी आहे. मोपलवारांशी मीच बोलत होतो. त्यामधील आवाजही माझाच आहे. या प्रकरणात मी माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. ऑडिओ क्लीपसंबंधीची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी किंवा इतर कुणीही जर ब्लॅकमेल करत असेल तर मोपलवारांनी याबाबत आतापर्यंत तक्रार का दिली नाही?, दरम्यान, याआधी एकदा माझं अपहरणही करण्यात आलं होतं. त्यामुळे माझ्या जीवाला सध्या धोका आहे. म्हणून मला पोलीस संरक्षण देण्यात यावं.' असं मांगलेनं सांगितलं.
या प्रकरणातील मी सीडी सीएमओ आणि पीएमओपर्यंत दिली आहे. त्यातील काही भाग कुणीतरी व्हायरल केला. माझ्यासारखे मोपलवारांकडे कामं घेऊन येणारे अनेकजण आहेत. ते काही कामं घेऊन येतात बिल्डरांची. नियमबाह्य कामांची फाईल मी मोपलवारांकडे घेऊन जायचो. त्यानंतर ते पुढे कुणाशी बोलायचे ते मला माहित नाही. पण त्यानंतर संबंधित फाईल क्लीअर करण्यासाठी किती पैसे ते सांगायचे.' अशी धक्कादायक माहिती मध्यस्थी सतीश मांगलेनं दिली आहे.
दरम्यान, मोपलवारांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं असलं तरी त्यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
मोपलवार हे समृद्धी महामार्गाचे प्रमुख तसंच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आहेत. दोनच दिवसांपूर्वी बोरीवलीच्या भूखंडासाठी कोट्यवधी रुपयाची लाच द्यावी लागणार असल्याचं ते एका मध्यस्थाला सांगत होते, हे संभाषण एबीपी माझाच्या हाती लागलं, त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लीपची सत्यता एबीपी माझाने तपासलेली नाही.
ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा आहे. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.
‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
या संभाषणात मोपलवार आहेत की नाहीत, याची पुष्टी आम्ही करत नाही… पण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या या आणि अशा अनेक ऑडिओ क्लिप्सची जोरदार चर्चा आहे.
मोपलवारांची कारकीर्द
वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली.
मोपलवारांचं स्पष्टीकरण
”माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.” असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं.
VIDEO :
संबंधित बातम्या :
एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची 'समृद्धी'?