मुंबई : बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा (Illegal Bike Taxi) देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपीडो, उबेर सारख्या ॲप आधारित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. शासनाने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले असताना अनेक कंपन्यांनी नियम न पाळता सेवा सुरू केल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Rapido Uber News : नियमांकडे दुर्लक्ष, सुरक्षा प्रशिक्षणाचाही अभाव
अनेक ॲप-आधारित कंपन्या चालकांना कोणतेही प्रशिक्षण न देता खासगी बाईकद्वारे प्रवासी सेवा देत आहेत. ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. अलीकडेच अशाच एका अवैध बाईक टॅक्सीवरून जाताना प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या तक्रारींनंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.
Maharashtra Action On Illegal Taxi App : नियम मोडणाऱ्यांना शिक्षा
मंत्री सरनाईक म्हणाले की, देशातील काही राज्यांत जसे नियमांकडे दुर्लक्ष करून बाईक टॅक्सी कंपन्या बेकायदेशीररीत्या व्यवसाय करतात, तसे महाराष्ट्रात चालणार नाही. ज्या कंपन्या प्रवाशांची सुरक्षा पाळतात, चालकांचे शोषण करत नाहीत आणि नियमांचे कठोर पालन करतात अशांनाच शासनाचा पाठिंबा असेल.
अज्ञानी चालकांचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंपन्यांवर धडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा सरनाईकांनी दिला. बेकायदेशीर वाहतूक करताना आढळलेल्या प्रत्येक बाईकसाठी गुन्हा चालकावर नव्हे, तर त्या ॲप कंपनीवर दाखल केला जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
घाटकोपर पोलिस ठाण्यात Rapido विरोधात गुन्हा दाखल
2 डिसेंबर रोजी मोटार परिवहन विभागाने रॅपीडो (Ropn Transport Pvt. Ltd.) विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
रॅपीडोवर खालील कलमांखाली कारवाई करण्यात आली —
कलम 66(1) – परवाना नसताना व्यावसायिक वाहतूक
कलम 192 – मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन
कलम 112 – वाहन वेगाचे उल्लंघन
Illegal Taxi Bike Service : बेकायदेशीर राइड शेअरिंग
मुंबई RTO च्या तपासणीत आढळले की रॅपीडो राइड शेअरिंगच्या नावाखाली प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक करत होते. प्रवासासाठी वापरली जाणारी वाहने खासगी (Non-Transport) असल्याचे स्पष्ट झाले. मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास बंदी आहे. कंपनीने नफा मिळवण्यासाठी नियमांची उघडपणे पायमल्ली केल्याचं दिसून आलं.
घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात तपासणीदरम्यान अनेक चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले. काही चालकांनी वेगमर्यादा ओलांडल्याचेही निदर्शनास आले.
ही बातमी वाचा:
