Manisha Mhaiskar : सकाळी 9.21 चा तो मेसेज… आणि सगळंच थांबलं; We Will Miss You Ajitdada, मनीषा म्हैसकरांची हृदयस्पर्शी श्रद्धांजली
Manisha Mhaiskar Post On Ajit Pawar : अजितदादांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामावर प्रचंड विश्वास होता, प्रत्येक वेळी ते अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहायचे असं ज्येष्ठ IAS अधिकारी मनीषा म्हैसकर सांगतात.

मुंबई : 28 जानेवारीची ती एक साधी, नेहमीसारखी व्यस्त सकाळ… पण 9.21 वाजता आलेल्या एका व्हॉट्सअॅप मेसेजनं सगळंच बदलून टाकलं. अजितदादांच्या विमानाचा अपघात... पुढच्याच क्षणी टीव्ही स्क्रीनवर दिसलेली दृश्यं आणि DGCA कडून आलेली दु:खद पुष्टी, अजितदादा आता आपल्यात नाहीत. वरिष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर (Manisha Mhaiskar IAS) यांनी व्यक्त केलेल्या या शब्दांमध्ये केवळ दुःख नाही, तर एका कणखर, परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या आणि अधिकाऱ्यांवर अपार विश्वास ठेवणाऱ्या नेत्याविषयीची खोल जिव्हाळ्याची भावना दडलेली आहे. 'We will miss you dada…' या चार शब्दांतून मनीषा म्हैसकर यांनी मांडलेली भावना आज अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.
Ajit Pawar Plane Crash News : सकाळी 9.21 चा तो संदेश…
मनीषा म्हैसकर लिहितात की, 28 जानेवारी रोजी सकाळी 9.21 वाजता व्हॉट्सअॅपवर पहिला मेसेज आला 'Ajit Dada’s flight met with an accident, details awaited.' त्यांनी तात्काळ टीव्ही सुरू केला आणि स्क्रीनवरील दृश्य पाहून हृदय पिळवटून गेलं. लवकरच DGCA कडून अधिकृत पुष्टी झाली, अजितदादा आता आपल्यात नाहीत. 'केवळ अविश्वसनीय, हे खरं असूच शकत नाही' अशा शब्दांत त्यांनी त्या क्षणाचं वर्णन केलं.
Sangli Drought 2003-2006 : सांगलीच्या दुष्काळातील पहिली ओळख
मनिषा म्हैसकर सांगतात की, सांगलीच्या जिल्हाधिकारीपदाच्या (2003-2006) काळात, जिल्हा भीषण दुष्काळाशी झुंज देत होता. त्या वेळी अजितदादांनी प्रशासनाला ठाम पाठिंबा दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दुष्काळावरुन राजकारण सुरू झाल्यावर दादांनी आपल्या ठसकेबाज आवाजात फटकारलं, जिल्हा प्रशासन दुष्काळात चांगलं काम करतंय. तुम्ही त्यांना उगाच त्रास देऊ नका.
अजितदादा अनेकदा सकाळी 7 वाजता सर्किट हाऊसवर बैठकींसाठी बोलावत. एवढ्या सकाळीही ते नीटनेटकं, टापटीप असत आणि नेमके प्रश्न विचारत. तथ्यांसह विश्लेषण मांडल्यावर ते समाधान मानत. अनेकदा ते आपल्या सहकाऱ्यांना सांगत, 'कलेक्टर म्हणतात ते बरोबर आहे.'
Manisha Mhaiskar DGIPR Years 2006-2009 : संवेदनशीलतेचा स्पर्श
DGIPR म्हणून काम करत असताना, प्रत्येक नव्या उपक्रमाला दादांनी प्रोत्साहन दिलं. एकदा ‘जय महाराष्ट्र’ मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी सांगितलेल्या भावाविषयीच्या भावनिक आठवणीनंतर अजितदादांच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून सर्वजण स्तब्ध झाले होते. त्यांच्या कठोर प्रतिमेमागे एक भावनिक मन दडलेलं होतं, याची ती झलक होती.
Baramati Development & PMU Meetings : बारामती ते PMU बैठका, परिपूर्णतेची छाप
2014 मध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना बारामती मेडिकल कॉलेजच्या प्रत्येक तपशीलाकडे दादांनी बारकाईने लक्ष दिलं. बारामती-पुणे-PCMC मधील इमारतीच्या बांधकामाच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर अजितदादांचं लक्ष असल्याचं त्या नमूद करतात.
PMU बैठकींसाठी अधिकारी ‘दादा-प्रूफ’ तयारी करत. म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर द्यावं लागे. दादा कडक शिस्तप्रिय होते आणि स्वतः जितके मेहनती, तितकंच इतरांकडूनही अपेक्षित करत.
Ajit Pawar Personal Moments : हलक्याफुलक्या आठवणी
मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर या अधिकारी दाम्पत्याशी अजितदादांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. एका बैठकीत मनिषा म्हैसकरांनी, 'मिलिंद, मिलिंद' असं दोन-चारवेळा हाक मारल्यानंतर दादांनी 'अहो मनिषाताई, नवऱ्या विषयी आदर बाळगा जरा, मिलिंद जी म्हणा' असा मिश्कीलपणे टोमणा मारल्याची आठवण मनीषा म्हैसकरांनी सांगितली.
Last Interaction Budget 2026 : शेवटची भेट… आणि अपूर्ण राहिलेली प्रस्तुती
निधनाच्या आदल्या दिवशीच TreDS प्रस्तावावर अजितदादांनी नेहमीप्रमाणे नेमके प्रश्न विचारले. PWD ने 700 कोटींचा लवाद प्रकरण जिंकल्याची आनंदवार्ता ऐकून ते समाधान व्यक्त करत म्हणाले की, पुढील बैठकीतही अशीच चांगली बातमी द्या.
अजितदादांबद्दल मनीषा म्हैसकर शेवटी म्हणतात, तुमच्या बजेटसंबंधी पुढच्या बैठकीसाठी आम्ही मनापासून तयारी केली होती, ती तुमच्यासमोर प्रस्तुत करायची होती... पण आता ती कधीच सादर करता येणार नाही. 'We will miss you dada.'

























