नालासोपारा: दिवसाढवळ्या सोसायटीत घुसून घरफोडी करणाऱ्या पती-पत्नीला अटक करण्यात तुळींज पोलिसांना यश आलं आहे. या दाम्पत्यानं आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 3 लाख किंमतीचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
दशरथ सोमा हा आपली पत्नी नेहा सोमाच्या मदतीनं घरफोडी करायचा. यांच्या साथीला मोहित अटकन हा देखील होता. नेहा सोसायटीत जाऊन बंद घरं हेरायची त्यानंतर ती दोघांनाही बोलावून घरफोडी करायचे. दोघेजण आत डल्ला मारत असताना नेहा मात्र, बाहेरच थांबून आजूबाजूला नजर ठेवायची. महिला असल्यानं सोसायटीतील नागरिकांना तिच्यावर संशयही येत नव्हता. याचाच फायदा घेऊन या टोळीनं वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनेक घरफोड्या केल्या.
नालासोपारातील अलकापुरी येथील देवांग मेहता यांच्या घरी 2 जानेवारीला घरफोडी झाली होती. यात साठ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. अशाच प्रकारे इतरही ठिकाणी चोरी झाल्याचं पोलिसांना लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत तीन आरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान, त्यांनी या परिसरातील आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
दरम्यान, त्यांचा आणखी एक साथीदार समिर बंगाला हा फरार आहे. पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.