मुंबई : पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर शिक्षक भरती व्हावी यासाठी सुरु असलेल्या आंदोलनातील 6 जणांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी? या भरतीत नेमक्या किती जागा असणार? शिक्षक भरतीची नेमकी डेडलाइन काय असणार? याबाबत प्रश्न विचारण्यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली.


आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही शिक्षक भरती पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडून शिष्टमंडळाला देण्यात आलं. याशिवाय, शिक्षणमंत्री शिक्षक भरतीच्या किती जागा रिक्त राहणार याबाबत बोलले नसल्याने संभ्रम कायम आहे. तर दुसरीकडे 20 हजार जागांचा आकडा शिक्षणमंत्री यांच्याकडून सांगण्यात आला होता. मात्र, तो आकडा आता कमी होण्याची शक्यता आहे.


आधी 15 जिल्ह्यात शिक्षक भरतीची जाहिरात काढू, असं विनोद तावडेंनी सांगितलं होतं. मात्र आज झालेल्या बैठकीत ज्याठिकाणी रिक्त जागा असतील तेथे पदे भरली जातील, असं आश्वासन शिक्षणमंत्र्यांकडून देण्यात आलं.


शिष्टमंडळ, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यात चर्चा सकारत्मक झाली आहे. मात्र आंदोलन विद्यार्थ्यांशी चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं शिष्टमंडळाने सांगितलं आहे. याबाबत आंदोलक पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुढील माहिती देणार आहेत.


पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर शिक्षक भरती व्हावी यासाठी अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. यातील काही उमेदवारांची तब्येत बिघडली होती. त्यांना ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र उपचार करुन ही मुलं पुन्हा उपोषणाला बसली.


संबंधित बातम्या


शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचं आठव्या दिवशी उपोषण सुरुच


8 दिवसात शिक्षक भरतीची जाहिरात काढणार : विनोद तावडे