मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दिली होती. त्या अनुषंगानं प्राथमिक स्वरुपात राज्यातील काही प्रमुख बालरोग तज्ज्ञ आणि राज्य टास्क फोर्ससमधील सदस्यांची  बैठक झाली. 


या टास्क फोर्ससमध्ये मुख्यत: बालरोगतज्ज्ञांचा समावेश असेल. यात डॉ. सुरेश प्रभु , डॉ. आरती किणीकर , डॉ. समीर दलवाई यांच्यासह राज्याच्या टास्क फोर्ससमधील डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांचाही समावेश असेल. 


लहान मुलांमधील कोरोना संक्रमणाचे आव्हान कसे पेलणार?
 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आणि विशेषत: लहान मुलांमध्ये कोरोनासंक्रमण रोखण्यासाठी विशेष पेडियाट्रीक टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे. या टास्क फोर्सच्या नियोजनाला सुरुवात झालीय. मुंबईत ३ वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रीक वॉर्डची विभागणी करण्यात येणार आहे.


4 ठिकाणी नवे जम्बो कोविड सेंटर उभारणार...मुख्यत्वे यात लहान मुलांच्या वॉर्डला प्राधान्य असेल.


1) कांजुरमार्ग, 
2)मालाड
3) सायन 
4) गोरेगांव 


याठिकाणी लहान मुलांचे वॉर्ड असलेल्या जम्बो सेंटरची उभारणी केली जाईल. केईएम, नायर, सूर्या हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये देखील विशेष कोरोना पॉझिटीव्ह पेडियाट्रीक वॉर्ड  असेल. तसेच, मुंबईतील महापालिकेच्या 28 मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेडही कोरोना पॉझिटीव्ह पेडियाट्रीक वॉर्डसाठी वापरणार आहेत.


तसंच, लहानमुलांच्या वॉर्डची विभागणी ही त्यांच्या वयोगटानुसार 6 ग्रुपमध्ये करण्यात येईल. या वयोगटानुसार, पालकांसोबत राहणारे, पालकांशिवाय डॉक्टरांसोबत राहु शकणारे, देखरेखीखाली राहु शकणारे अशा गटांमध्ये विभागणी करण्यात येईल.


0-3
3-6
6-9
9-12
12-15
15-18
अशा 6 वयोगटांमध्ये विभागणी करण्यात येईल. या पेडियाट्रीक वॉर्डमध्ये काऊंसिलर, फिजीओथेरीपिस्ट , भूलतज्ञ यांची विशेष नेमणूक केली जाईल.


लहान मुलांमध्येही  कोरोनाची लागण वेगानं  होतेय तसंच  तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही यापूर्वी स्पष्ट केलं होतं. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत.


विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.