मुंबई : मेट्रो 2 बीच्या कामासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी कोर्टात धाव घेतलेल्या एमएमआरडीएला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मेट्रो मार्गिकेचे पिलर उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी एमएमआरडीएने एका याचिकेद्वारे हायकोर्टात केली आहे. मात्र न्यायालयाने ही मागणी धुडकावून लावत तूर्तास या कामावरील स्थगिती कायम ठेवली आहे. चार ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
डी. एन. नगर अंधेरी ते मानखुर्द या उन्नत मेट्रो 2 बी मार्गाच्या कामामुळे ध्वनी प्रदूषण होणार असून या कामामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मेट्रो 2 बीचे भुयारीकरण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट हाऊसिंग सोसायटी, गुलमोहोर एरिया वेल्फेअर सोसायटी ग्रुप आणि नानावटी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी एमएमआरडीएच्या वतीने न्यायालयाने घातलेली स्थगिती उठविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. परंतु न्यायालयाने स्थगिती उठवण्यास नकार देत याबाबतची सुनावणी चार ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.