High Court On Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. आंदोलकांनी हजारो गाड्या मुंबईत आणल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाला आज सुट्टी असताना देखील सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सदर सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलाना विरोधात सदावर्ते यांनी देखील याचिका दाखल केली होती.
सुट्टी रद्द करुन हायकोर्ट उघडलं, मोठा निर्णय येणार?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. परंतु मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्य केले आहे. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत केलं होतं. तसेच आझाद मैदानात आंदोलनासाछी 5 हजार लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पोलिसांनी कोणत्या अटी ठेवल्या होत्या?
1) आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल.
2) ठराविक वाहनांनाच परवानगी असेल. वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलीसांच्या सल्ल्याने करावी लागेल. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरपर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त 5 गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील.
3) आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानासाठी सात हजार चौ. मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्याने त्यांचा हक्क अबाधित राहील.
4) आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही.
5) परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
6) आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.
7) आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही. आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये.
नरिमन पॉईंट कुलाबा मंत्रालय परिसरात जाणाऱ्या बसेस पूर्णतः बंद-
गेल्या चार दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत, आज मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव हे आझाद मैदानावर आले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला असून पश्चिम दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट कुलाबा मंत्रालय या परिसरात जाणाऱ्या बसेस पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत.