मुंबई : एखाद्या व्यक्तीचा खाजगी फोटो तिच्या परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीनं वापरणं हे कृत्य अयोग्यच असून ते शिक्षेस पात्र आहे. असं निरिक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं साक्षी मलिक या एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला मोठा दिलासा दिला आहे. 'व्ही' हा तेलगु सिनेमा ताबडतोब आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून उतरवण्याचे निर्देश ॲमेझॉन प्राईमला हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. तसेच केवळ चेहरा ब्लर करून भागणार नाही तर सिनेमातील ते आक्षेपार्ह दृश्य वगळेपर्यंत हा सिनेमा ॲमेझॉनवर पुन्हा प्रदर्शनासही हायकोर्टानं मनाई केली आहे. साक्षी मलिक या अभिनेत्रीनं निर्मात्यांविरोधात हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यापुढे यावर सुनावणी सुरु असून तूर्तास 8 मार्चपर्यंत हे प्रकरण स्थगित करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
दाक्षिणात्य सिनेमांत काम करणारी एक मॉडेल आणि अभिनेत्री साक्षी मलिकनं वेंकटेश्वर क्रिएशनविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकलाय. यात साक्षीनं आरोप केलाय की, 'व्ही' या तेलगु सिनेमात तिच्या परवानगीशिवाय तिचा एक फोटो दाखवण्यात आला आहे. केवळ इतकच नव्हे तर एक वेश्या व्यवसाय करणारी महिला म्हणून हा फोटो वापरण्यात आला आहे. हा फोटो साक्षीनं साल 2017 मध्ये आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केल्याचं म्हटलं आहे. या प्रकारामुळे आपल्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून बराच मानसिक त्रास झाल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या निकालात नेमकं काय म्हटलंय?
एखाद्या व्यक्तीचा खाजगी फोटो तिच्या परवानगीशिवाय वापरणं हे एक गैरकृत्यच आहे. त्यामुळे हा प्रकार निश्चितपणे मानहानीच्या दाव्यास पात्र आहे. कारण हा फोटो नेमका कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या पद्धतीनं वापरला गेला हेही तितकचं महत्वाचं आहे. जर त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्यासाठी किंवा त्याला कमी लेखण्यासाठी तो केला गेला असेल तर हे प्रकरण अधिक गंभीर होऊ शकतं. असं न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी आपल्या आदेशांत म्हटलं आहे. त्यामुळे हा सिनेमा तात्काळ ॲमेझॉन प्राईमवरून हटवण्याचे निर्देश देत जोपर्यंत या सिनेमातील ते दृश्य पूर्णपणे वगळण्यात येत नाही तोपर्यंत हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Metro Car Shedच्या वादावर 12 मार्चपासून अंतिम सुनावणीला सुरुवात; जागा मालकाला भरपाई देऊ, MMRDAची हायकोर्टात माहिती
- Bollywood Celeb IT Raid: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकराची छापेमारी