Monsoon 2025 Mumbai Rains: मुंबई आणि ठाणे परिसरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज दिवसभरात मुंबई आणि ठाण्यात ठराविक अंतराने पावसाच्या जोरदार पावसाच्या सरी (Mumbai Rains) बरसण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सातत्याने कोसळत आहेत. परंतु, अद्यापपर्यंत मुंबईत कुठेही मोठ्याप्रमाणावर पाणी साचलेले नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळू शकतो. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. दक्षिण मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर मुंबई उपनगरात पावसाच्या जोरदार सरी अधुनमधून बरसत आहेत.  येत्या दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता  आहे.

नैऋत्य मोसमी पाऊस, अर्थात मान्सून नियोजित वेळेपूर्वीच म्हणजेच आठवडाभर आधी केरळमध्ये दाखल झाला आहे. 2009 नंतर प्रथमच मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. शनिवारी दिवसभरात मान्सूनने केरळ आणि तामिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला होता. त्यानंतर मान्सूनने कर्नाटकच्या दिशेने वाटचला सुरु केली होती. मान्सून कालपर्यंत गोव्याच्या वेशीपर्यंत पोहोचला होता. पुढील काही तासांमध्ये मान्सून कोकणात दाखल होऊ शकतो. दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते सध्या स्थिर आहे. परिणामी महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुण्यात रिमझिम पाऊस

पुण्यात रविवार पहाटेपासून रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेला , 'कोथरूडमध्ये पाणी तुंबू देऊ नका', असे आदेश दिले आहेत. पावसामुळे निर्माण होणाऱ्या  समस्या त्वरित सोडविण्यासाठी कोथरूड मतदारसंघात एक समन्वय अधिकारी नेमावा, अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. शहरात एकूण 201 मुख्य नाले असून त्यापैकी 15 नाले हे कोथरूड मतदारसंघातून वाहतात. या नाल्यांची सफाई 80 टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे.

Beed Rain: बीड जिल्ह्यात पावसामुळे 132 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनाम्याचे आदेश

 बीड जिल्ह्यात अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने 132 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आष्टी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून 98 शेतकऱ्यांची 38 हेक्टर शेत जमीन खरडून गेलीय. दरम्यान या पावसाने शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. कोणत्याही आदेशाची वाट न पाहता अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

आणखी वाचा

मान्सूनचं आगमन! कोकण किनारपट्टीवर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा अंदाज काय?