मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरु असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे. दादर, माटुंगा, वांद्रे भागात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. तर दक्षिण मुंबई तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही जोरदार पाऊस कोसळतो आहे. ठाणे आणि कल्याणमध्येही रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे.
- पश्चिम रेल्वेवर सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळं वाहतुकीचा खोळंबा, हार्बरवर सीएसटी-अंधेरी रेल्वे वाहतूक विस्कळीत
दरम्यान, पालघर आणि बोईसरमध्ये ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे गाड्या विस्कळीत झाल्या आहेत. गुजरातकडे जाणाऱ्या आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
दुसरीकडे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ठाण्याजवळ खारेगाव टोलनाक्याच्या येथे मोठ्या प्रमाणात ट्रफिक असल्याची माहिती समजते आहे.