कल्याण-डोंबिवली महापालिकेचं मुख्यालयच अनधिकृत! माहितीच्या अधिकारात उघड
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2018 05:02 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील तीन इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने नेमलेल्या समितीने याबाबतचा अहवाल दिला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील तीन इमारती अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने नेमलेल्या समितीने याबाबतचा अहवाल दिला आहे. या अहवालातील माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात कल्याण-डोंबिवली महापालिकेचं मुख्यालय आहे. या मुख्यालयात प्रशासकीय भवन आणि महापालिका भवनाच्या इमारती आहेत. या इमारतींना लागूनच अत्रे रंगमंदिर आणि झुंजारराव व्यापारी संकुल आहे. या तिन्ही इमारती खेळाचं मैदान आणि स्टेडियमच्या आरक्षित जमिनीवर बांधण्यात आल्या आहेत. शिवाय आरक्षित भूखंडावर इमारती बांधताना त्याची कुठल्याही प्रकारची परवानगी शासनाकडून घेण्यात आलेली नव्हती. याबाबतच्या चौकशीसाठी शासनानं २००७ साली अग्यारी समितीची स्थापना केली होती. या समितीने २००९ साली शासनाला सादर केलेल्या अहवालात महापालिकेच्या इमारती अनधिकृत असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि विवेक कानडे यांनी या अहवालाची प्रत समोर आणली आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामं वाचवताना केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त लाचखोरीच्या प्रकरणात अडकतात. तर दुसरीकडे केडीएमसीची इमारतच अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. आता याप्रकरणी दोषी असलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.