मुंबई : मुंबईत दहीहंडी खेळताना जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धारावीमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय कुश खंदारेला प्राण गमवावे लागले.

बाळ गोपाळ मित्र मंडळातर्फे धारावीत दुपारी दहीहंडी फोडण्यासाठी थर रचले जात होते. त्यावेळी कुश थरावर चढत असताना
त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला.

बेशुद्धावस्थेतच कुशला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. कुश धारावीतील राम गोपाळ चाळीतील रहिवासी होता.

मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना आतापर्यंत एकूण 121 गोविंदा जखमी झाले आहेत. 25 गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर 95 जणांना उपचार करुन सोडून देण्यात आलं आहे. सायन, केईएम, नायर, रहेजा, भाभा, राजावाडी या रुग्णालयांमध्ये गोविंदांवर उपचार सुरु आहेत.

दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेल्या 14 वर्षीय चिराग पटेकर या गोविंदाला मुंबईतील भाजप आमदार आशिष शेलार यांच्याकडून एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. चिराग पटेकरवर खार इथल्या होली फॅमिली हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्साहात साजरी झाली. ठाण्यात मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी महिला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.