मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन शिवसेनेनं मुखपत्रं सामनातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा आधार घेत सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील फाईल आपल्या टेबलवर असती, तर क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी परळीत केलं होतं. हाच धागा पकडत मराठा आरक्षणासंदर्भातील फाईल मोकळी करायला सरकार चालढकल करत आहे असं सामनातून म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी फाईलीचा लाल दोर सोडावा किंवा पंकजा यांना तासाभरासाठी सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल करावं असा तिरकस टोलाही लगावण्यात आला आहे.
सामनात काय म्हटलंय?
‘मुख्यमंत्री पहाटे तीन–तीन वाजेपर्यंत जागून काम करतात’, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगत असतात. ते खरे असेलही. कारण मराठा क्रांतीने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील! म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी फाईल कोठे आहे हे शोधून आता तरी फायलीचा लाल दोरा सोडावा व मराठा समाजाची मागणी पुढे न्यावी!
जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये? असाही प्रश्न आंदोलकांना आता पडला असेल. मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील तर सौ. पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे. पंकजाताईंची भूमिका समजून घेतली पाहिजे.’ असं 'सामना'त म्हटलं आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
"माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते. पण हे प्रकरण कोर्टात असल्याने विलंब होत आहे, ती फाईल ना माझ्या टेबलवर आहे, ना मुख्यमंत्र्यांच्या, हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे विलंब होत आहे, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी 26 जुलैला बीडमधील परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
संबंधित बातम्या
माझ्या टेबलवर फाईल असती, तर कधीच मराठा आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे
मराठा आरक्षण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा: सुरेश धस
सरकार बरखास्त करुन निवडणूक घ्या, आमदार भालकेंचं आव्हान
'तासाभरासाठी पंकजाताईंना मुख्यमंत्री करा'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2018 08:42 AM (IST)
पंकजा मुंडेंना यांना एक तासासाठी का होईना, पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे, असा टोमणा सामनातून लगावण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -