मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटना (Ghatkopar Hording Collapsed)  घडल्यानंतर याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता आहे. भावेश भिंडेच्या मागावर  मुंबई पोलिसांची 7 पथकं आहे.  वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरु असून भिंडे राज्याबाहेर पळाल्याचा  संशय आहे.  भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळले. त्यानुसार मुंबई पोलीसांची टीम तिथे पोहचली. मात्र त्यापूर्वीच भिंडे पसार झाला होता.


घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल  केला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला आहे. भिंडेच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच त्याने मोबाईल बंद केला. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. 


भावेश मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीत


भावेश भिंडे इगो मिडीया प्रा.लिमिटेडचा संचालक आणि मालक आहे. गुजु असं त्याचं टोपण नाव सुद्धा आहे. गुजु अॅडवर्टाइज या नावानं तो जाहिरात संस्थाही चालवत होता. पण त्याच्याविरुद्ध तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेनं ती काळ्या यादीत टाकली. महापालिकेच्या या कारवाईनंतरच या महाभागानं इगो मिडीया नावानं नवी कंपनी स्थापन केली. घाटकोपर ते ठाणे या गुजरात्यांची संख्या जास्त आहे. इथंच या भावेशचा धंदा बहरलाय. या पट्ट्यातल्या अनेक होर्डिंगवरच्या जाहिराती हा भावेशच करतो. भावेशच्या घरचा पत्ता मुलुंडचा आहे,पण मुलुंडऐवजी दुसरीकडंच कुठं तरी त्याचं वास्तव्य असण्याची शक्यता आहे.


भावेश विरोधात अनेक गुन्हे दाखल


 घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबईचे पोलीस रात्रीच भावेशच्या या पत्त्यावर पोचले, पण तो कुटुंबासह फरार झाला होता आणि त्याचा फोनही बंद आहे. भावेश भिंडेची मुंबईत अनेक होर्डिंग आहेत आणि ते उभारताना त्यानं 21  वेळा नियमांचा भंग केलाय.याबद्दल त्याच्याविरुद्ध तक्रारी येऊन गुन्हेही दाखल झाले आहे. गेल्याच महिन्यात भावेशनं होर्डिंगच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या महापालिकेच्या परस्पर छाटल्या होत्या आणि काही झाडांवर विषप्रयोग करुन झाडं मारुन टाकण्याचाही प्रयत्न केला होता. याबद्दल मुंबई महापालिकेनं रेल्वे प्रशासनाना नोटीस देऊन भावेशचा परवाना रद्द करा असे आदेश दिले होते. 


घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर, बचावकार्य पूर्ण होण्यास 18 ते 20  तास लागण्याची शक्यता 


घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 16 वर पोहोचलाय.तर 41 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 50 तासापासून रेस्क्यू काम सुरू आहे. आतापर्यंत होर्डिंगचा 50 टक्के सांगाडा पेट्रोल पंपावरून बाहेर काढण्यात आला आहे.. होर्डिंगच्या सांगाड्याखाली लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. तर ज्या पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग पडून अपघात झाला तो संपूर्ण पंपच अनधिकृत असल्यातचं समोर आलंय. हा भूखंड गृहखात्याचा असून महसूल विभागाची परवानगी न घेता त्या ठिकाणी वाणिज्य कामासाठी वापरला जात होता. त्याबाबत पोलीस गृहनिर्माण महामंडळाला अहवाल मागवला होता. या भूखंडावर पेट्रोल पंप कामासाठी ना हरकत प्रमाणपत्राची विचारणा करण्यात आली होती. मात्र पोलीस गृहनिर्माण महामंडळाने वेळोवेळी पोलीस महासंचालक आणि रेल्वे पोलीस आयुक्त यांना पत्रव्यवहार करत सुरू असलेल्या पेट्रोल पंप बांधकामावर हरकत घेतली होती. हे बांधकाम थांबवणयाबाबत पोलिस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांनी गृहविभागाला पत्र व्यवहार करून परवानगी नाकारल्याचा अभिप्राय देण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे.