Ghatkopar Hoarding Falls: मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या वादळामुळे घाटकोपर (Ghatkpor) येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर (Ghatkopar Petrol Pump) अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. या घटनेमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 75 जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला. या भीषण अपघातामध्ये अनेक गाड्यांचा देखील चुरडा झाला आहे. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली वाहने दाबली गेली. या घटनेनंतर सदर होर्डिंग हे अनधिकृत असल्याचं समोर आलं.
मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला. (120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता) राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे. मात्र याचदरम्यान नवीन माहिती समोर येत आहे. घाटकोपर येथे याच जागेवर अनधिकृत चार महाकाय जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. ते फलक दिसावे म्हणून आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने फेब्रुवारीत घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्याचे निर्देश-
दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख देण्याचे जाहीर केले असून जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येतील. तसेच अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित-
मुंबई महापालिकेकडून 40 बाय 40 स्क्वेअर फुट होर्डिंग परवानगी असताना तब्बल 120 स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आलं होतं. त्यामुळे ही परवानगी दिली तरी कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंपाच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. त्यामुळे गॅस कटरचा पर्याय सावधपणे वापरला जात आहे. महाकाय होल्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आहे ते अनधिकृत असल्याचे समोर आलं आहे. त्या होर्डिंग्जला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमधील हजारोंनी असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.