मुंबई: न्यायालयाने घाटकोपर होर्डिंग प्रकरणी (Ghatkopar Hoarding Collapsed) भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर होर्डिंग केसमध्ये भावेश भिंडेला मुंबई क्राइम ब्रँचने जोधपूरहून अटक केल्याची न्यायालयात माहिती दिली. या प्रकरणात मुंबईतील 16 नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमी झाले आहेत. 


आरोपी भावेश भिंडे याच्याकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसोबतच इतर 3 ते 4 होर्डिंगची जबाबदारी होती. त्या प्रत्येक एका होर्डिंगचा खर्च 3 ते 4 कोटीचा असल्याची पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. या प्रकरणात भावेशने होर्डिंगसाठी परवानग्या घेतल्या आहेत का? घेतल्या असतील तर त्याबाबत कुणाची मदत घेतली आहे? असे प्रश्न असून यातील आर्थिक व्यवहारही तपासणे गरजेचे असल्याचे सांगत पोलिसांनी आरोपीची कस्टडी मागितली. त्यानंतर न्यायालयने आरोपीला 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


वर्षाला चार कोटी रेल्वे आयुक्तालयाला जायचे


इगो मिडियाच्या डायरेक्टरपदी जानवी म्हात्रे या होत्या. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर 22 नोव्हेंबर 2022 रोजी भावेश भिंडेची नियु्क्ती करण्यात आली असल्याचा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या होर्डिंगचे वर्षाला 4 कोटी रुपये हे रेल्वे पोलिस आयुक्तलयाला दिले जात असल्याची आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. 


घटनेच्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाऱ्याचा वेग हा ताशी 96 किलोमीटर इतका होता. एरव्ही वाऱ्याचा वेग आहे ताशी 50 ते 60 किमी इतका असतो. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला. 


तपास गुन्हे शाखेकडे वर्ग


घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने याआधीच या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक केली होती. होर्डिंग दुर्घटनेनंतर अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला होता. गुन्हे शाखेने भिंडेला उदयपूरमधील रिसॉर्टमधून अटक केली. आता त्याच्याविरोधातील हे प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. 


ही बातमी वाचा: