नगरसेवकाला मारण्यासाठी 1 कोटींची सुपारी, आरोपीची कबुली
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2017 06:41 PM (IST)
कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक असून आगामी काळात आमदारकीचेही ते दावेदार मानले जातात. मात्र, त्यांना मारण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी ११ लाख रुपये आधीच घेतल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
कुणाल पाटील, भाजप पुरस्कृत नगरसेवक, केडीएमसी
डोंबिवली : डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी घेतल्याची धक्कादायक कबुली दरोड्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीनं दिली आहे. कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक असून आगामी काळात आमदारकीचेही ते दावेदार मानले जातात. मात्र, त्यांना मारण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी ११ लाख रुपये आधीच घेतल्याची कबुली आरोपीने दिली आहे. डोंबिवलीतल्या भाजपाच्याच एका बाहुबली नगरसेवकाने आपल्याला ही सुपारी दिल्याचं त्याने आपल्या जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीसह एकूण ६ जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्याकडून १ पिस्तूल, १ रिव्हॉल्व्हर, २ गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसं यासह ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम एवढा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आता या सुपारी प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला असून लवकरच डोंबिवलीच्या एका भाजपा नगरसेवकालाही अटक होण्याची शक्यता आहे.