अनेक लोकांचा एकाच वेळी फोन आल्याने अग्निशमन दलाने नऊ गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या. महानगर गॅस लिमिटेडनेही आपल्या आपत्कालीन गाड्या सर्व ठिकाणी पाठवून तपासणी केली. मात्र कुठेही पाईपलाईन फुटलेली किंवा दुसरी कोणती घटना दिसून आली नाही. त्यानंतर राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर या कंपनीतून गॅस येत असल्याचा संशय आल्याने तिथेही अग्निशमन दलाने पाहणी केली.
मात्र ही गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्यापही सुरु असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. तर ज्या भागातून फोन आले त्या भागात आपत्कालीन टीम सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे काल रात्री नेमका कोणता गॅस लीक झाला होता, कुठून लीक झालेला, एवढ्या लोकांना एकाच वेळी त्याचा कसा वास आला, अशा अनेक प्रश्नांची उत्तर अजून सापडली नाहीत.
दरम्यान "आमच्या कंट्रोल रुममध्ये गॅस दुर्गंधीच्या एकूण 29 तक्रारी आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांसह महानगर गॅस लिमिटेडच्या आठ इमर्जन्सी व्हॅन रवाना केल्या आहेत," अशी माहित मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे दिली.