मीरा रोड : मीरा रोड येथील काशीमिरा येथे एका 25 वर्षीय तरुणीवर ओला कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मीरारोड येथील एका मॉलमध्ये काम करत होती. 19 डिसेंबरला रात्री साडेआठच्या दरम्यान तिने काशीमिरा येथून ठाण्यासाठी ओला कार केली. तरुणी जेव्हा या कारमध्ये बसली त्यावेळी त्या कारमध्ये आणखी एक व्यक्तीही होती. पण ही कार शेअरिंग असेल असं वाटल्यानं तरुणीनं त्यामधून प्रवास सुरु ठेवला.

पण ही कार ठाण्याच्या दिशेन न नेता ती ड्रायव्हरनं वजेश्वरी रोडच्या दिशेनं नेली. त्यानंतर एका निर्जन स्थळी ड्रायव्हर आणि कारमधील त्या व्यक्तीनं त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, तरुणीच्या तक्रारीनंतर काशीमिरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटकही केली आहे. पण पोलीस या संपूर्ण प्रकरणाविषयी कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत. किंबहुना ही संपूर्ण घटना पोलिसांकडून लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचीही सध्या चर्चा आहे.