मुंबई: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमन्यांची लगबग सुरु झाली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात पोहोचणे अत्यंत अवघड गोष्ट असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यात गणतपतीच्या काळात रेल्वेने कोकणात (Konkan Railway) जायचे म्हटले की, ते आणखीनच वेगळे दिव्य असते. कारण गणपतीसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकिटांचे बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तिकीटं हाऊसफुल्ल होतात. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदा रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. 


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात आणखी 20 गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून म्हणजे बुधवारपासून सुरु होणार आहे. मध्य रेल्वेकडून यापूर्वीच गणपतीसाठी 202 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेषच्या 8 फेऱ्यांचा समावेश आहे. ही 01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6, 7, 13 आणि 14 सप्टेंबरला सुटेल आणि रत्नागिरी स्थानकात दुसऱ्या दिवशी 4 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाणे 01032 विशेष गाडी रत्नागिरी येथून 7,8,14, 15 सप्टेंबर यादिवशी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.


पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ सप्टेंबरला ००.२५ वाजता सुटून रत्नागिरीला सकाळी ११.५० वाजता पोहोचेल. तसेच ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ सप्टेंबर रोजी ५:५० वाजता सुटून पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. ही ट्रेन चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल. यामध्ये पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्यांचा समावेश आहे. ०१४४१ विशेष गाडी २१ सप्टेंबर रोजी ४:४० वाजता पनवेल येथून सुटून रत्नागिरी येथे ११:५० वाजता पोहोचेल. तर ०१४४२ विशेष गाडी १० रोजी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या दोन फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत. यामध्ये ०१४४५ विशेष गाडी १० रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११.५० वाजता पोहोचेल.


गणेशोत्सवाच्या काळा जादा एसटी बसेस


दुसरीकडे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणासाठी मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून 2 आणि 3 सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


चाकरमान्यांसाठी निलेश राणेंची भाजप एक्स्प्रेस


गणेश उत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजप एक्सप्रेस, दादर ते कुडाळ यादरम्यान सोडण्यात येणार आहे. 5 सप्टेंबरला ही भाजप एक्सप्रेस दादर वरून सकाळी 10 वाजता कुडाळला येण्यासाठी सुटणार आहे. या गाडीचे बुकिंग करण्यासाठी निलेश राणेंनी आपल्या सोशल मीडिया वर संपर्क नंबर दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेची व्यवस्था केली आहे.


आणखी वाचा


अवघ्या पाच मिनिटात सगळी तिकीटं संपली, कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग फुल्ल, वेटिंग लिस्ट 700 ते 800 च्या घरात