ठाणे : ठाण्यात बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून केमिस्टचा व्यवसाय करणाऱ्या चार दुकानदारांसह बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे गुहे शाखेच्या युनिट-1 ने ही कारवाई केली आहे. या सर्वांविरोधात विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणायत आला आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पथक करीत आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपी अरविंदकुमार लाछिराम भटचे खोपट येथे आदर्श मेडिकल आहे. तर आरोपी राजू दशरथ यादवचे दिवा-भिवंडी येथे जय मेडिकल आहे. आरोपी बुधाराम बभूतराम आजेनियाचे काल्हेर भिवंडी येथे सेन्ट्रल मेडिकल आहे. आरोपी बलवंतसिंह खुशालसिंह चौहानचे मनोरमानगर ठाणे येथे महावीर मेडिकल आहे. मेडिकल चालवण्यासाठी फार्मसिस्ट असणे गरजेचे असते. मात्र हे चारही आरोपी दहावी आणि बारावी अनुतीर्ण असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.
ठाणे ढोकाळी येथील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायझेशन या संस्थेत विनाअट डी फार्मसीसाठी प्रवेश दिला जातो. त्यानंतर माध्यमिक शिक्षा परिषद महाराष्ट्र, माध्यमिक शिक्षा परिषद उत्तरप्रदेश, माध्यमिक शिक्षा परिषद अजमेर, नवी दिल्ली या संस्थांच्या नावाचे दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र दिले जाते. तसेच डी फार्मसीचे प्रशिक्षण न घेता प्रमाणपत्र दिले जाते. संस्थचे चेअरमन पुरुषोत्तम ताहिलरामानी यांच्याकडून या सर्वांनी डी फार्मसीचे प्रमाणपत्र घेऊन मेडिकल स्टोर्स सुरू केल्याचं तपासात समोर आलं आहे.
गुन्हे शाखेने संस्था प्रमुख ताहिलरामानीलाही बेड्या ठोकल्या आहे. आता सर्व मेडिकल स्टोर्सचे चालक यांच्या दहावी आणि बारावी परीक्षेचे प्रमाणपत्र वाशी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कार्यालयात तपासले असता ते बनावट असल्याचे समोर आले. दीपाकर घोष यांच्या तक्रारीवरुन गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. सर्व पाच आरोपींविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात आयपीसी 420, 465, 467, 468, 471 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यता आले, त्यानंतर न्यायालयाने या सर्वांना 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.