मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येचा छडा अवघ्या 24 तासात लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलं असून, आतापर्यंत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर चौघांचा शोध सुरु आहे.
पूर्ववैमनस्यातूनच ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोर व्यवसायात एकत्र काम करत असल्याची माहिती मिळत आहे. कामावरुन काढून टाकल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी कांदिवलीत धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. समतानगरमधील राहत्या घरापासून केवळ 200 मीटर अंतरावर अशोक सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला.
रविवारी रात्री अकराच्या सुमारास काही बाईकस्वार हल्लेखोरांनी अशोक सावंत यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
अशोक सावंत यांनी दोन वेळा नगरसेवकपद भूषवलं होतं. तर त्यांची मुलगीही एक वेळा नगरसेवक होती.
संबंधित बातम्या
शिवसेनेच्या प्रतिनिधींवर आतापर्यंत झालेले हल्ले आणि हत्या
मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या