कल्याण : कोरोना काळात अनेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघात अक्षरश: तळ ठोकून आहेत. जनतेच्या सेवेची एकही संधी अनेक लोकप्रतिनिधी सोडत नाहीयेत. मात्र असेही काही लोकप्रतिनिधr आहेत जे लोकांकडे फिरकलेच नाहीत. उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी हे निवडणुकीदरम्यान विकासकामांबाबत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शिवाय कोरोना काळात नागरिक धास्तावले असताना ते विधानसभा मतदारसंघात फिरकेलच नाहीत. येत्या आठवडाभरात त्यांनी मतदारसंघात कार्यरत व्हावे, नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात अन्यथा सात दिवसांनी दिसाल तिथे चपला मारू आणि दररोज मारू असा इशारा भाजपचेच माजी प्रवक्ते व बांधकाम व्यवसायिक राम वाधवा यांनी भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना दिलाय.

कोरोना काळात लोकांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. म्हणून राम वाधवा यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. इतकंच नव्हे तर याबाबत राम वाधवा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ट्वीट देखील केलं आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्याने दिलेल्या या इशाऱ्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तर याबाबत भाजप आमदार कुमार आयलानी यांनी देखील राम वाधवा यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मी शहराच्या हिताचं काम करतोय, त्यामुळे मला कुणाची भीती नाही. मी कुणाला घाबरत नाही. कुणाची जर हिम्मत असेल तर मी रस्त्यावर एकटा फिरतो त्यांनी यावे, असं आव्हान कुमार आयलानी यांनी दिलं आहे. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करणार असून याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देखील ही गंभीर बाब सांगणार असल्याचं आमदार आयलानी यांनी सांगितलं आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

संबंधित बातम्या