कल्याण : पब्जी खेळण्याच्या वादातून एका तरुणाने आपल्या बहिणीच्या भावी पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेच्या 6 दिवसांनी पोलिसांना गुन्हा नोंदवण्यासाठी जाग आली असून आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही.
अंबरनाथच्या लोकनगरी भागात राहणाऱ्या ओम बावधनकर यांचं कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका मुलीशी लग्न ठरलं असून साखरपुडाही झाला आहे. 7 फेब्रुवारी रोजी ओम हा त्याच्या भावी पत्नीच्या घरी होता. यावेळी तिचा भाऊ पब्जी गेम खेळत असताना त्याच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. त्यामुळं त्यानं चार्जर घेतलं असता चार्जरची वायर घरातल्या पाळीव कुत्र्यानं खाल्ल्याचं त्याला दिसलं. हे कुत्रं ओमच्या भावी पत्नीनं पाळलेलं असल्यानं भावा-बहिणींमध्ये जोरदार वाद झाला. त्यातच संतापलेल्या भावानं किचनमधून चाकू आणून बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापून टाकली. यामुळे ओमने त्याला जाब विचारला असता त्याने ओमच्या पोटावर चाकूने वार केले.
या घटनेनंतर ओमवर आधी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल आणि मग कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र 7 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडूनही कोळसेवाडी पोलिसांनी 6 दिवसांनी गुन्हा दाखल केला. तर त्यानंतर तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपी मेहुण्याला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळं कोळसेवाडी पोलीस मॅनेज झाले आहेत का? असा प्रश्न जखमी ओम बावधनकर यांनी विचारला आहे. तर पोलिसांनी मात्र तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगत कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
पब्जी खेळण्यामुळे वाद, होणाऱ्या भाऊजीवर मेव्हण्याने वार केले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2019 07:44 PM (IST)
कुत्रं ओमच्या भावी पत्नीनं पाळलेलं असल्यानं भावा-बहिणींमध्ये जोरदार वाद झाला. त्यातच संतापलेल्या भावानं किचनमधून चाकू आणून बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापून टाकली. यामुळे ओमने त्याला जाब विचारला असता त्याने ओमच्या पोटावर चाकूने वार केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -