मुंबई : मुलुंडमध्ये रावणदहनावेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीबद्दल पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. कारवाईच्या मागणीसाठी भाजप नेत्यांनी ठिय्या मांडला होता.
किरीट सोमय्या यांनी विजयादशमीनिमित्त आयोजित केलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमात शिवसेनेनं धुडगूस घातला होता. त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी घटनास्थळीच भाजपचे आमदार आणि खासदार रात्री 12 वाजेपर्यंत ठिय्या मांडून बसले होते.
मारहाणीत जखमी झालेल्या महिलांनी नवघर पोलिस स्थानकात जाऊन तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पाच जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणामुळे किरीट सोमय्यांच्या घरी रात्रभर पोलिसांचा पहारा होता.
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या रावणाच्या दहनाचा कार्यक्रम किरीट सोमय्यांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घुसून धुडगूस घातला. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आनंद म्हाब्दी यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
भारतीय जनता पक्ष किरीट सोमय्या यांच्या सोबत असून, शिवसेनेने केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो, असे भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.