मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मात्र राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी, त्यानंतरच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे.
"राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र गेले काही वर्षे मनसेने ज्या पद्धतीने उत्तर भारतीयांना वागणूक दिली, मारझोड केली त्याबद्दल माफी मागावी", अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.
"उत्तर भारतीयांशी संवाद साधण्याआधी, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी. आमच्याकडून चुकी झाली, असं राज ठाकरेंनी सांगावं. आपली चूक मान्य करावी. त्यानंतर उत्तर भारतीय समाजाशी संबंध जोडावेत. उत्तर भारतीय समाजही राज ठाकरे यांना मोठ्या मनाने स्वीकारेल", असं संजय निरुपम म्हणाले.
येत्या 2 डिसेंबर रोजी मुंबईतील कांदिवली इथे बुराभाई हॉलमध्ये सकाळी अकराच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होते, जे आता त्यांनी स्वीकारलं आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसंच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता. आता ते उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली भूमिका मांडणारआहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी इमेज तयार करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे.