कल्याण: कल्याण पश्चिमेतील चिकणघर आणि खडकपाडा परिसरात असणाऱ्या गॅरेजला आज रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅरेजसह त्यातील 2 गाड्यांचाही अक्षरशः कोळसा झाला. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.


येथील खडकपाडाकडून चिकणघरकडे जाणाऱ्या रस्त्यावर संदीप हॉटलेच्या मागे हे गॅरेज आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या गॅरेजमध्ये असणाऱ्या ऑइल आणि इतर ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले.

आगीची माहिती मिळताच, कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत गॅरेज, त्यातील 2 गाड्या (4 व्हीलर) आणि गॅरेजशेजारील पानाची टपरी पूर्ण जळून खाक झाली.

अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या साहाय्याने ही आग नियंत्रणात आणली गेली.