Mumbai Hospital Fire News: मुंबईतील वाडिया रुग्णालयाला आग आटोक्यात आली आहे. हे रुग्णालय लहान मुलांचे आहे. पण ज्या ठिकाणी आग लागली होती,  ते ऑपरेशन थिएटर आज बंद होतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले आहे. रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यानंतर आता येथे कुलिंगचं काम सुरु आहे. 


 मुंबईतील लहान मुलांचं नामांकित वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर सायंकाळी भीषण आग लागली होती. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आगीच्या घटनेने परिसर प्रचंड हादरला होता. रुग्णालयातही भीतीचं वातावरण होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.  दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येताना दिसत होते. त्यानंतर पहिल्या मजल्यावर ज्या लहान बाळांवर उपचार सुरु होते त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 


 मुंबई सेंट्रेल येथील अग्निशमन दलाकडून वाडिया रुग्णालयातील आगीसंदर्भात माहिती देण्यात आली. ही आग संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास लागली होती. आग लेव्हल दोनची होती. दरम्यान, मुंबईतील वाडिया रुग्णालय हे लहान मुलांचं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे वाडिया रुग्णालयातील आगीची घटना ही अनपेक्षित आहे. आगीच्या घटनेमुळे वाडिया रुग्णालया आणि परिसरात भीतीचं वातावरण होतं. 


मुंबईत आगीच्या घटना -
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वारंवार आगीच्या घटना घडल्याचं समोर आले आहे. 29 जुलै रोजी अंधेरी येथील चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना घडली होती, यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय जुलै महिन्यात पवई येथील हिरानंदानी येथील हायको सुपर मार्केटमध्येही आगीची घटना घडली होती. तर जूनमध्ये पनवेलमध्ये एका बंगल्याला आग लागली होती, यामध्ये तीन मुलांना वाचवण्यात आले होते. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बोरीवलीमध्ये16 मजली इमारतीला मध्यरात्री आग लागली होती.