मुंबई : शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांच्यासह पती विपुल दोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवल्याचा भाजप नगरसेविकेचा आरोप आहे. बोरिवली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नगरसेविका संध्या विपुल दोशी या आधी राष्ट्रवादीत होत्या आणि या महापालिका निवडणुकांच्या वेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीत गोराई प्रभागातून त्या निवडून आल्या आहेत.

गोराईमधील स्थानिकांनी तिथल्या उद्यानात अवैध धंदे चालतात अशी तक्रार केल्यामुळे तिथल्या भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर या काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला बगीच्याची पाहणी करायला गेल्या. त्यावेळी त्यांना तिथे जिमचं बांधकाम सुरू असल्याचं दिसलं. त्यावेळी त्यांनी विचारपूस केली असता त्यांना स्थानिक शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांचे पती विपुल दोशी यांच्या मालकीचं ते जिम असल्याचं कळलं. हे बांधकाम अवैध असल्याची तक्रारही स्थानिक रहिवासी आदित्य पांडे यांनी केली होती.

त्याचप्रमाणे या जिममधे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या कचऱ्याच्या मोठ्या पेट्या ठेवल्याचं त्यांना आढळलं. त्यावेळी त्यांनी स्थानिक वॉर्ड ऑफिसरला बोलावून विचारणा केली आणि तातडीनं कारवाई करण्यास सांगितले.

तिथून निघून जात असताना संध्या दोशी आणि त्यांचे पती विपुल दोशी तिथे आले आणि त्यानंतर वातावरण तापलं. त्यावेळी संध्या दोशी आणि त्यांचे पती विपुल दोशी यांनी तक्रारदार आदित्य पांडे यांना धमकावलं आणि पिस्तुल रोखल्याची गुन्ह्यामध्ये नोंद आहे. मात्र, त्यांनी खेडेकरांना धमकावल्याची एफआयआरमधे नोंद नाही.

त्यामुळे तसा गुन्हा बोरिवली पोलिस स्टेशनमधे दाखल आहे. या गुन्ह्यामधे संध्या दोशी, विपुल दोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नावं आहेत. दुसरीकडे संध्या दोशी यांनी क्रॉस कम्प्लेंट करत आदित्य पांडे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी वॉर्ड ऑफिसमधे घोषणाबाजीही केली.