मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार की नाही हा तिढा सुटल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मुंबई लोकल मधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी आज देण्यात आली आहे. राज्य सरकारने केलेल्या मागणीला रेल्वे बोर्डाने मंजुरी देऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच जेईई आणि नीट या दोन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकल मधून प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मुंबई लोकल चा प्रचंड फायदा झाला. त्यानंतर राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा किडा सुटत नव्हता. अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही यासोबत या परीक्षेचे स्वरूप कसे असेल यासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनात एकमत होत नव्हते. अखेर काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील असेही जाहीर करण्यात आले. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सोय उपलब्ध नसेल त्यांना जवळच्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल असेही जाहीर करण्यात आले.
असे असले तरी या विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करावा याबाबत प्रश्नचिन्ह होते. अखेर राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करून अंतिम वर्षाची परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा मागितली. राज्य सरकारच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देऊन या विद्यार्थ्यांना मुंबई लोकांनी प्रवास करण्याची परवानगी आता दिली आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसोबत जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनादेखील मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी असेल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
मुंबई लोकल ने प्रवास करायचा असेल तर स्टेशनवर प्रवेश घेताना परीक्षा केंद्रावरील हॉल तिकीट दाखवावे लागेल. हे हॉल तिकीट बघूनच या विद्यार्थ्यांना स्टेशन मध्ये प्रवेश दिला जाईल. आणि त्यानंतर तिकीट काढून मुंबई लोकलने त्यांना प्रवास करता येईल. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवास करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.