मुंबई : राज्यभरात आमच्या विभागाकडून कारवाया सुरू आहेत, शाळेबाहेर सकस आहाराचे आदेश दिले आहेत, त्याच पालन सुरू आहे. फूड सेफ्टी आयुक्तांना काही अधिकार आहेत, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फूड सेफ्टी आयुतांना काही काळासाठी किंवा वेळेसाठी बंदी घालण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार, महाराष्ट्रात ॲनॉलॉग पनीरवर बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी म्हटले. ॲनॉलॉग पनीर (Paneer) म्हणून नॉन डेरी पनीर विकल जातं, त्याचे विपरीत परिणाम होतात. म्हणून, महाराष्ट्रात 30 जुलै रोजी नोटीफिकेशन काढून उत्पादन प्रक्रिया, साठवणूक वाहतूक आणि विक्रीवर, वितरणावर बंदी घालण्यात आल्याचंही मुंढे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर एका वर्षासाठी ही बंदी आहे, पुढे लागली तर ही बंदी वाढवली जाईल, असेही मुंढेंनी स्पष्ट केले. विभागाकडे अनेक तक्रारी होत्या, त्यावर चर्चा देखील सविस्तर झाली आहे, विधिमंडळ सभागृहात देखील चर्चा झाली. त्यानंतर, मार्केटमधून पनीरचे 308 नमुने घेतले होते. त्यामध्ये, 89 सबस्टँडर, 38 असुरक्षित (Unsafe)आढळले. 32 टक्के नमुन्यांमध्ये सुरक्षितता नसल्याचं समोर आलं, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
ॲनालॉगमध्ये वनस्पती चरबीचा वापर
पनीर हा दुधाचा पदार्थ आहे, पण ॲनॉलॉग पनीरमध्ये नॉन दुग्धजन्य पदार्थ आढळले, लोकांची दिशाभूल होते म्हणून असे आदेश दिले आहेत. छुप्या पद्धतीने हे ॲनॉलॉग विकले जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे सगळे आदेश उत्पादक प्रक्रिया करणारे, वाटूकदार, वितरक, विक्रेते यांच्यावर बांधकारक आहेत. त्यामुळे, हॉटेल देखील ॲनॉलॉग वापरू शकत नाही. या ॲनॉलॉग पनीरमध्ये प्रोटीनपेक्षा वनस्पती चरबी आढळली आहे, स्निग्धांश जास्त आहेत म्हणून हे आदेश काढण्यात आले आहेत. ॲनॉलॉग पनीर साठी कोणताही स्टँडर्ड नाही, अशी माहिती मुंढे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही - मुंढे
ॲनॉलॉग आणि पनीरबाबत विशेष तपासणी मोहिम राबवणार असून संशयित उत्पादनांचे नमुने घेऊन पुढील कारवाई होईल. याबाबत सगळ्या अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहकांना ओरिजनल पनीर मिळावं, पॅकिंगवरील सगळे नॉर्म पाळले गेले पाहिजेत. लोकांना संशय आल्यास लोकांनी टोल फ्री क्रमांकार तक्रार करावी. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, अशा शब्दात तुकाराम मुंढेंनी इशारा दिला आहे. दरम्यान, ॲनॉलॉग पनीरवर बंदी आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असू शकेल, असा दावाही त्यांनी केला.
आत्तापर्यंत 55.72 कोटींचा माल नष्ट
राज्यात 25 मे पासून 31 जुलै पर्यंत राज्यात 3137 आस्थापनाची तपासणी केली असून 764 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, 165 आस्थापनांचा परवाना निलंबन करण्यात आला आहे. तसेच, आत्तापर्यंत एकूण 28,66,096 किलो ग्रॅम माल नष्ट करण्यात आलाय, त्याची एकूण किंमत 55.72 कोटी रुपये एवढी आहे. तसेच, राज्यात 890 हॉटेलची तपासणी केली असून 329 हॉटेल्सला सुधारणा नोटीस बजावल्या आहेत, तर, 116 हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
