‘बाबाल्हा पैसं नाय दिलं, तय त्याहानं मना कुटला’ अशी मन पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया त्या चिमुरड्याने दिली आहे. पाच वर्षांच्या या चिमुरड्याचं नाव सूर्या असं आहे. अठरा विशे दारिद्र्य असलेले सूर्याचे कुटुंब भीक मागून आपली गुजराण करतं. त्याने कमी भीक आणली म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या हाताचे हाड मोडले असून वडिलांबद्दलची भीती आजही त्याच्या मनात कायम आहे.
सूर्याचा पिता संजय हा पत्नी आणि चिमुकल्या सूर्याला भीक मागायला लावतो आणि मिळणाऱ्या पैशातून मौजमजा करतो, असे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी चिमुकला सूर्या पालघर शहरात नेहमीप्रमाणे भीक मागून घरी आला. घरी आल्यानंतर पैसे कमी आणले या रागाने त्याच्या वडिलाने त्याच्या डाव्या हातावर एका दंडुक्याने प्रहार केला. त्यात सूर्याच्या हाताचे हाड मोडले. मारहाण करत असताना शेजाऱ्यांनी संजयला थांबवले. मात्र वेदनेने विव्हळत असलेला सूर्या त्यावेळी तिथून पळून गेला. मंगळवारी सूर्या पालघर शहरातील बिकानेरी येथे सूर्या भीक मागत असताना रडत होता. तिथे उभ्या असलेल्या काही तरुणांनी त्याच्या रडण्याचे कारण विचारले. मात्र सुरुवातीला तो काहीच बोलला नाही. या तरुणांनी त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने घडलेली कहाणी सांगितली.
सामाजिक बांधिलकी जपत केवल घरत, सनी जैन, पिंटू ठाकूर आणि प्रथम बोरडेकर या तरुणांनी सूर्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी व आरोग्य सेवा देणाऱ्या वर्षां काटेला यांनीही सूर्याच्या उपचारांसाठी बरीच खटाटोप केली. बुधवारी अस्थिरोग तज्ज्ञांमार्फत त्याची तपासणी करण्यात आली असून पुढील उपचार सुरू आहेत.
या चिमुकल्याला मारहाण करणारा त्याचा पिता गेल्या चार दिवसांत फक्त एकदाच या रुग्णालयात येऊन गेला. या उलट गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शेजारी कृष्णा घुटे हा आपली मजुरी बुडवून सूर्यासोबत रुग्णालयात त्याची देखभाल करत आहे. दरम्यान, मारहाणप्रकरणी सूर्याचे वडील संजय याचा जबाब पोलिसांनी घेतला आहे, मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही.