Rakesh Tikait in Mumbai : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत आज मुंबईत आहेत. मुंबईत आज ते काही आंदोलनांमध्ये भाग घेतील. त्यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला असता त्यांनी तीन कृषी कायद्यांसह MSPवर भाष्य केलं.
त्यांनी म्हटलं की, आम्ही आज आझाद मैदानात जाणार आहोत. शेतकरी आंदोलनासंबंधी आपली भूमिका तिथं स्पष्ट करणार आहोत. आज मुंबईत संयुक्त किसान मोर्चाची बैठक आहे. तिथं जमीन अधिग्रहण आणि आदिवासींच्या संदर्भात चर्चा होईल.
टिकैत म्हणाले की, आमची मागणी आहे की, भारत सरकारनं आमच्याशी चर्चा करावी. आम्हाला निवडणुकांशी काही देणं घेणं नाही. आंदोलन कधीपर्यंत चालेल हे तर भारत सरकारच सांगेल, असंही टिकैत म्हणाले.
MSP बोलताना ते म्हणाले की, MSP बाबत आमची मागणी अशी आहे की MSP चा कायदा बनवा. शेतकरी आंदोलनादरम्यान 700 हून अधिक शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला. याबाबत बोलताना टिकैत यांनी म्हटलं की, मृत्यूचा काही मोबदला नसतो. पण तरीही आमची सरकारकडे मागणी आहे की, शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत करावी.
कंगनाच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, आजारांचं नाव सतत घ्यायचं नसतं. कंगनाकडून सरकार हे वदवून घेत आहे. भाजपवाल्यांकडं वेड्यांची जत्रा भरली आहे. कंगना एक आजार आहे. आम्ही तिच्यावर जास्त लक्ष केंद्रीत करत नाहीत. कंगनासारख्या लोकांना प्रमोट करुन सरकार लोकांना मुद्द्यांवरुन भरकटवू पाहात आहे, असं राकेश टिकैत म्हणाले.
राकेश टिकैत आंदोलनावर ठाम
तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं सरकारला झुकावं लागलं. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मात्र आंदोलन आताच मागे घेणार नसल्याचं म्हटलं. कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर राकेश टिकैत यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील. तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल, असं राकेश टिकैत म्हणाले होते.