मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी परिवाराने INS विराट युद्धनौकेचा मनोरंजनासाठी टॅक्सीसारखा वापर केला, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप माजी नौदल प्रमुख एल रामदास यांनी खोडून काढला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी सरकारी कामासाठी INS विराटवर आले होते. राजीव गांधी यांच्यासोबत कुणीही विदेशी व्यक्ती नव्हती. नौदलाला बदनाम केलं जात असून कौटुंबिक वापरासाठी INS विराट कधीच वापरण्यात आली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य खोटं असल्याचं एल रामदास यांनी सांगितलं.
लक्षद्वीप येथे जाण्यासाठी राजीव गांधी आणि सोनिया गांधींसोबत आले होते. राष्ट्रीय खेळांच्या बक्षीस वितरणासाठी मुख्य अतिथी म्हणून राजीव गांधी यांनी आमंत्रित करण्यात आलं होतं. लक्षद्वीप येथे अधिकृत सरकारी कामासाठी त्यांनी INS विराटचा वापर केला होता, असं एल रामदास यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींवर केलेले आरोप चुकीचे आणि नौदलाची बदनामी करणारे : निवृत्त अॅडमिरल राव
या दौऱ्यात पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर कोणीही विदेशी नागरिक उपस्थित नव्हते. या प्रवासात मी त्याच्याबरोबर होतो. त्यांच्यासाठी मी एक डिनरचं आयोजनही केलं होतं. याशिवाय इतर कोणतीही पार्टी INS विराट किंवा इतर कोणत्याही जहाजावर झाली नाही, असं एल रामदास यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधानांना त्यांच्या दौऱ्यात त्यांच्या पत्नीला घेऊन जाण्याची मुभा असते. त्यामुळे या प्रवासात काही बेटांवर राजीव गांधी आणि सोनिया गांधी गेले होते. मात्र ते तिथे लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटायला गेले होते. काही डायव्हर्सना त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते. राहुल गांधी या प्रवासात राजीव गांधी यांच्याबरोबर नव्हते, असं एल रामदास यांनी सांगितलं.
याबाबतचा कार्यक्रम अनेक दिवस आधीच तयार केला जातो. कुठलही जहाज हे गांधी कुटुंबियांच्या खासगी वापरासाठी वळवण्यात आले नव्हते, अशी माहिती एल रामदास यांनी दिली.
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
राजीव गांधी आपल्या सासरच्या मंडळींसोबत आयएनएस विराट या युद्धनौकेवरुन सुट्टीवर गेले होते. दहा दिवस सर्व जण एका बेटावर राहिले. तिथे युद्धनौकेवरील कर्मचारीवर्ग त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.