मुंबई : रेल्वे स्थानक असो किंवा एखादा मॉल प्रत्येक ठिकाणी आता जिन्याची जागा एस्केलेटर म्हणजेच सरकत्या जिन्यांनी घेतली आहे. या सरकत्या जिन्यावर पाय ठेवतात काही मिनिटांमध्ये आपण कुठलेही कष्ट न घेता आपण ये जा करू शकतो. परंतु हे सरकते जिने कधीकधी जीव घेणे देखील ठरू शकतात. मुलुंडच्या आर मॉल मध्ये अशीच एक घटना घडली आहे. दीड वर्षाचा चिन्मय राजीवडे या चिमुकल्याला आपल्या हाताची तीन बोटं गमवावी लागली आहेत.

चिन्मय राजीवडे आपल्या आई-वडिलांसह आर मॉलमध्ये खरेदीसाठी आला होता. खरेदी झाल्यानंतर हे तिघे देखील पहिल्या माळ्यावरून सरकत्या जिन्याच्या साहाय्याने खाली उतरले. परंतु आईवडिलांच्या नकळत चिन्मय पुन्हा या सरकत्या जिन्याकडे वळला आणि त्याने हा सरकता जिना चढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात चिन्मय खाली कोसळला आणि सरत्या जिनाच्या पॅसेजमध्ये त्याची तीन बोट अडकली गेली. यावेळी चिन्मय जोरात ओरडला. त्याच्या आई-वडिलांचा लक्ष त्यांच्याकडे गेलं परंतु आई-वडील त्याच्याकडे पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. चिन्मयची तीनही बोटं एस्केलेटरमध्ये अडकून हातावेगळी झाली होती.

यानंतर चिन्मयला त्याच्या पालकांनी फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल केलं. परंतु चिन्मयच्या हातांच्या नसा दबल्या गेलेल्या असल्यामुळे ही तीनही बोटं पुन्हा डॉक्टरांना जोडता आली नाहीत.

सरकते जिने आता कायद्याच्या चौकटीत, विधेयक विधानसभेत मंजूर

या प्रकरणांमध्ये पालकांचा निष्काळजीपणा जितका कारणीभूत आहे तितकाच कारणीभूत आहे मॉल प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील असल्याचे बोलले जात आहे. आता आर मॉलमधील या जिन्याचं मेंटनन्सचं काम सुरू करण्यात आलं आहे. तज्ञांच्या मते सरकत्या जिन्याना देखील सेन्सर्स असतात. या सेन्सर्समुळे एखादा अडथळा आलाच तर हे सरकते जिने लगेच बंद होतात. सोबतच अशा सरकत्या जिन्यांच्या जवळ एक अटेंडंट असणं देखील तितकंच गरजेचं असतं. यासंदर्भात प्रशासनाकडून नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. परंतु बऱ्याच मॉलमध्ये या सरकत्या जिन्याचा मेंटेनन्स केला जात नाही. सोबतच सरकत्या जिन्यांच्या जवळ अटेंडंट देखील नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात असं तज्ञांचे मत आहे.

दरम्यान यासंदर्भात अद्यापपर्यंत मुलुंड पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. परंतु या घटनेमुळे हे सरकते जिने किती जीवघेणे ठरू शकतात आणि पालकांनी अशा ठिकाणी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं किती गरजेचा आहे हे स्पष्ट होत आहे.