मुंबई : राणीच्या बागेतील प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना पेंग्विन पाहण्यासाठी शंभर रुपये प्रवेशशुल्क घेण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे प्रौढांना पुढील दोन महिने पेंग्विनचं दर्शन घेता येणार नाही, बालकांना मात्र मोफत पेंग्विन पाहता येतील.


प्रवेश शुल्क वाढीबाबत प्रशासनाला ठोस करणे देता न आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या सभेत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. पुढील दोन महिन्यांत अभ्यास करून सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आला आहे.

प्रस्ताव फेटाळण्यात आल्यामुळे पुढील दोन महिने जुन्याच दराने प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहेत. मात्र प्रौढांना पेंग्विनचे दर्शन दिले जाणार नसून बारा वर्षांखालील मुलांनाच पेंग्विन पाहता येणार आहे. बारा वर्षांखालील मुलांकडून पेंग्विन पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे महापौर स्नेहल आंबेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे पुढील दोन महिने लहान मुलांनाच पेंग्विन पाहता येणार आहे.

इतर प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत राणीच्या बागेत प्रवेश शुल्क फारच कमी आहे. त्यामुळे याचा अभ्यास करुन अहवाल आणल्यास दोन महिन्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल.

पेंग्विनच्या पिंजऱ्याचे काम 20 दिवसांत पूर्ण होईल, असे महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले आहे. ते काम झाल्यावर महापालिका शाळांमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पेंग्विनच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात यावे अशी सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे आंबेकर यांनी सांगितले.