मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळचे आमदार विवेकानंद शंकर पाटील (Vivekanand Patil) यांच्यावर कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची स्थावर स्वरुपाची मालमत्ता ईडीने जप्त केलीये. विवेकानंद शंकर पाटील यांच्या 152 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आली. या मालमत्तेमध्ये भूखंड, बंगला तसेच रहिवाशी संकुलाचा समावेश करण्यात आला आहे. 


विवेकानंद पाटील हे कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. दरम्यान याच बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीकडून त्यांच्या 152 कोटींच्या मालेमत्तेवर तात्पुरती टाच मारण्यात आलीये. तसेच या मालमत्तेमध्ये विवेकानंद पाटील यांच्या कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा देखील समावेश करण्यत आला आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात एकूण  386 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलीये. 






नेमकं प्रकरण काय?


कर्नाळा बँकेत 512 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याची माहिती देण्यात आली. तर याचा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील हे मुख्य आरोपी असल्याची समोर आली होती. फेब्रुवारी 2020 मध्ये कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी 17 संचालकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तत्कालीन गृहखातं हे या प्रकरणाची चौकशी करण्यात चालढकलपणा करत असल्याचा आरोप देखील भाजप आमदारांकडून करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर ईडीकडे मार्च 2020 रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीनं याप्रकरणी तपसा सुरु केला. चौकशी अंती अखेर 12 ऑगस्ट 2021 रोजी विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांची 234 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. 


कर्नाळा बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा


रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी हा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या केला होता.सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बॅंकेने या बँकेचे ऑडिट केले त्यावेळी कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचं समोर आलं. दरम्यान मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेनामी खातेदारकांच्या नावाने खाते उघडण्यात येत होते.या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची कर्जरुपी रक्कम जमा केली जात होती. हीच रक्कम आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये विवेक पाटील यांनी वळवल्याचा आरोप भाजपने केला होता.