मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह आणि धामधूम सुरू असतानाच, मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराचा अत्यंत निष्काळजी आणि ढिसाळ कारभार समोर आला आहे. जोगेश्वरी पूर्वेतील श्याम नगर तलावाजवळील कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जन (Mumbai News) करत असताना विजेचा तीव्र शॉक (Mumbai News) लागून रोहित भीमसिंग राठोड या अवघ्या १९ वर्षांच्या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आईचे छत्र आधीच हरपलेल्या या तरुणाच्या अचानक जाण्याने त्याच्या वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण जोगेश्वरी परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.(Mumbai News)
Mumbai News: नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या जवळील श्याम नगर तलाव परिसरातील पालिकेच्या कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. रोहित राठोड हा १९ वर्षीय तरुण तिथे विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन सुरू असतानाच कृत्रिम तलावातील पाण्यात किंवा तेथील विजेच्या यंत्रणेत अचानक वीज (करंट) उतरली. पाण्यात उतरलेल्या या विद्युत प्रवाहामुळे रोहितला विजेचा भीषण शॉक लागला आणि तो गंभीररीत्या होरपळला. उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ शेजारीच असलेल्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
Mumbai News: वडिलांचा काळीज पिळवटणारा आक्रोश
रोहित हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचे आधीच निधन झाले होते. आता तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि घराचा आधार बनू पाहणाऱ्या एकुलत्या एका मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या वृद्ध वडिलांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. रुग्णालयाच्या परिसरात वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.
Mumbai News: नातेवाईकांचा प्रशासनाला थेट सवाल अन् पोलिसांत तक्रार
या दुर्दैवी घटनेनंतर रोहितचे भाऊ आणि नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनावर थेट ताशेरे ओढले आहेत. "विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी का घेतली गेली नाही? निष्पाप तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण?" असा थेट सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण दुर्घटनेप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. कृत्रिम तलावात वीज कशी उतरली, यात कोणाचा निष्काळजीपणा होता आणि घटनेला नेमके कोण दोषी आहे, यासंदर्भात मेघवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Mumbai News: मुंबईत गणेशोत्सव मंडपाजवळ विजेचा धक्का; २ जणांचा मृत्यू
तर काळाचौकीत दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाजवळ झालेल्या दुर्घटनेत मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळील तात्पुरत्या कोल्ड्रिंक स्टॉलमध्ये शाॅर्ट स्क्रिप्ट झाला, विजेचा धक्का लागून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ वर्षीय रागिणी घनश्याम यादव आणि ३३ वर्षीय सुजाता यांचा समावेश आहे. अन्य ४ जण जखमी; त्यापैकी १२ वर्षीय रुही सिंहची प्रकृती गंभीर, ICUमध्ये उपचार सुरू आहेत. BEST अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली; तात्पुरत्या मीटरची वायरिंग/MCB डिस्कनेक्ट केली आहे, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
