(Source: ECI | ABP NEWS)
Shivsena : शिवसेना शिंदे गट अलर्ट मोडवर, निवडणुकीपर्यंत शाखाप्रमुखांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर न पडण्याचा आदेश जारी
Eknath Shinde : जर एखाद्या नेत्यावर त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरची जबाबदारी दिली तर त्याचे पालन करावे असा आदेश पक्षाकडून जारी करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने कंबर कसली असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत कुणीही आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ नयेत असा आदेश शिंदे यांनी दिला आहे. हा आदेश शिवसेना शाखाप्रमुखापर्यंत (Shivsena) लागू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होईपर्यंत नेत्यांनी, आमदार-खासदारांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि शाखाप्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच राहण्याच्या सूचना
पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्षेत्राच्या बाहेर जाणार असल्यास तसे मध्यवर्ती कार्यालयात कळवणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
BMC Election : शाखाप्रमुख अलर्ट मोडवर
जर एखाद्या नेत्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर इतर कार्यक्षेत्रातील जबाबदारी दिल्यास त्याने त्याचे पालन करावे असा आदेशही पक्षाकडून देण्यात आला आहे. पक्षाचा हा आदेश शाखाप्रमुखापर्यंत लागू असेल असं पत्रात म्हटलं आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्याचा आदेश दिला आहे.
Shivsena Meeting : स्वबळावर लढण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येंही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम असून दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे. ठाण्यातील संजय केळकर, नवी मुंबईतून गणेश नाईक आणि इतर भाजपच्या नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत होत असलेल्या वक्तव्यांमुळे शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
Maharashtra Elections : युतीबाबत संभ्रम कायम
राज्यातील महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती करायची की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाल्याचं चित्र नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तीनही पक्ष महायुती म्हणून लढू शकतात. पण इतर ठिकाणचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेतला जाण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णयाचा अधिकार असल्याचं भाजपने आधीच स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीबद्दल काहीशी नाराजी असल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपसोबत युती करायची आहे, पण अजितदादांची राष्ट्रवादी युतीमध्ये नको असा काहीसा सूर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. तर अनेक ठिकाणी निवडणुका या स्वबळावर लढाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
























