अंबरनाथमध्ये चोरट्यांनी अंड्यांचा ट्रक पळवला
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2018 01:54 PM (IST)
हा ट्रक अंबरनाथच्या टी सर्कलजवळ येताच एक कार मागून येऊन या ट्रकच्या पुढे थांबली. या कारमधून उतरलेल्या चौघांनी ट्रकचालक मोहम्मद शेख आणि त्यांचा मुलगा मुजम्मिल यांना मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि डोळ्यांना पट्टी बांधून टिटवाळ्याजवळच्या रायता गावाजवळ जंगलात नेऊन सोडलं.
अंबरनाथ : चोरट्यांनी चक्क अंड्यांनी भरलेला ट्रक चोरुन नेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या घटनेत पाच लाखांच्या अंड्यांसह ट्रक चोरुन नेण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. चोरीला गेलेला ट्रक हा कर्नाटकच्या बिदर इथून अंडी घेऊन अंबरनाथला येत होता. अंबरनाथच्या महाराष्ट्र एग्ज सेंटरमध्ये त्यांना ही अंडी पोहोचवायची होती. त्यासाठी शनिवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास हा ट्रक अंबरनाथच्या टी सर्कलजवळ येताच एक कार मागून येऊन या ट्रकच्या पुढे थांबली. या कारमधून उतरलेल्या चौघांनी ट्रकचालक मोहम्मद शेख आणि त्यांचा मुलगा मुजम्मिल यांना मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि डोळ्यांना पट्टी बांधून टिटवाळ्याजवळच्या रायता गावाजवळ जंगलात नेऊन सोडलं. त्यांच्याजवळचा मोबाईल आणि पैसेही चोरट्यांनी काढून घेतले. तर इतर साथीदारांनी अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन पलायन केलं. या ट्रकमध्ये 5 लाख रुपये किमतीची 1 लाख 41 हजार नग अंडी होती. या चोरीप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या ट्रक आणि चोरट्यांचा शोध घेत आहेत.