मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची तब्बल अकरा तासांच्या चौकशीनंतर सुटका करण्यात आली. मनी लॉन्ड्रिग प्रकरणात ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण दिल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अस्थिर झालेल्या शिवसेनेच्या अडचणीत यामुळे अधिक वाढ होत आहे.


दापोलीतील साई रिसॉर्ट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. या प्रकरणी अनिल परब यांची तब्बल अकरा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले. ईडीला आणखी काही माहिती आवश्यक असल्यास आपण ती देऊ असं ते म्हणाले.


अनिल परब यांना ईडीने मागील आठवड्यात चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते चौकशीसाठी अनुपस्थित राहू शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. 


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू असल्याचा  आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले होते.  काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.  


अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे.